सिरोंचा पोलीस पथकाकडून पाहणी व चौकशी ; जुगाराचा खेळ किंवा पैशांची देवाणघेवाण आढळली नसल्याचे स्पष्ट …!
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात क्लबच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जुगाराचे खेळ सुरू असून, त्यामध्ये पैशांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असल्याची बातमी गेल्या दोन दिवसांपासून वृत्तपत्रे तसेच सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली होती. या वृत्तामुळे तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर सिरोंचा पोलीस प्रशासनाने संबंधित प्रकरणाची दखल घेत घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी व चौकशी केली.सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने संबंधित ठिकाणी भेट दिली. यावेळी घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तसेच तेथे सुरू असलेल्या खेळांबाबत आणि पैशांच्या व्यवहारांबाबत चौकशी करण्यात आली. क्लबच्या नावाखाली जुगार खेळविला जात असल्याच्या वृत्ताच्या अनुषंगाने पोलिसांनी वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, घटनास्थळी पाहणी व चौकशी केली असता तेथे कोणत्याही प्रकारचा जुगाराचा खेळ सुरू असल्याचे आढळून आले नाही. तसेच पैशांवर खेळ खेळला जात असल्याचे किंवा पैशांची देवाणघेवाण होत असल्याचेही निदर्शनास आले नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.“संबंधित ठिकाणी पोलीस पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी व चौकशी केली. मात्र, घटनास्थळी कोणत्याही प्रकारचा जुगाराचा खेळ किंवा पैशांवर खेळ सुरू असल्याचे आढळून आले नाही,” *असे सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले* .गेल्या दोन दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा सुरू असल्याने पोलिसांच्या या पाहणीकडे नागरिकांचे लक्ष लागले होते. सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन केलेल्या चौकशीत सध्याच्या परिस्थितीत जुगाराचा प्रकार आढळला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्याने या चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे. *अवैध प्रकार आढळल्यास कारवाईची अपेक्षा* सिरोंचा तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने पोलिसांनी अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. एखाद्या ठिकाणी क्लब किंवा मनोरंजनाच्या नावाखाली अवैध जुगार अथवा पैशांवर खेळ सुरू असल्याची माहिती मिळाल्यास त्याची योग्य पडताळणी करून संबंधितांवर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.सध्या संबंधित घटनास्थळी केलेल्या पाहणीदरम्यान जुगाराचा खेळ किंवा पैशांची देवाणघेवाण आढळून आली नसल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केले आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या प्रत्यक्ष पाहणी व चौकशीला महत्त्व प्राप्त झाले आहे.








