सिरोंचा पोलिसांकडून बाजारपेठ, मंडई व बसस्टॉप चौकात जनजागृती अभियान; OTP, UPI PIN आणि संशयास्पद लिंकपासून दूर राहण्याचे आवाहन
संपादक – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : महाराष्ट्र सायबर सुरक्षा जनजागृती महिन्यानिमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनच्या वतीने नागरिकांमध्ये सुरक्षित डिजिटल बँकिंग आणि सायबर फसवणुकीबाबत जनजागृती करण्यात आली. दिनांक १० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७.२५ ते ८.३० वाजेपर्यंत स्थानिक बाजार समिती परिसर, मंडई तसेच बसस्टॉप चौक येथे नागरिकांशी संवाद साधून सायबर सुरक्षेचे महत्त्व पटवून देण्यात आले.महाराष्ट्रात १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या सायबर जनजागृती अभियानांतर्गत हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक गोकुळ राज, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक अहेरी हर्षवर्धन बी. जे. आणि सिरोंचा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या नेतृत्वात ही जनजागृती करण्यात आली.या अभियानादरम्यान नागरिकांना ऑनलाइन आर्थिक फसवणूक, UPI व्यवहार करताना घ्यावयाची खबरदारी, बनावट लिंक, घातक मोबाईल ॲप्स आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील अंदाजे २० ते २५ नागरिकांसह पत्रकार बांधव उपस्थित होते.OTP, UPI PIN कोणालाही सांगू नका!सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तींचे फोन, संदेश आणि व्हिडिओ कॉल याबाबत सतर्क राहावे. बँक अधिकारी, पोलीस किंवा शासकीय अधिकारी असल्याचे सांगून कोणी वैयक्तिक अथवा बँक खात्याची माहिती मागितल्यास अधिकृत माध्यमातून खात्री करावी. आपला OTP, ATM PIN, CVV, UPI PIN आणि पासवर्ड कोणाशीही शेअर करू नये, असे आवाहन करण्यात आले.तसेच KYC अपडेट, बँक खाते बंद होणार, लॉटरी लागली किंवा बक्षीस मिळाले असल्याचे सांगणाऱ्या बनावट संदेशांवर विश्वास ठेवू नये. अनोळखी लिंकवर क्लिक करणे, अनधिकृत ॲप्स डाउनलोड करणे आणि पैसे मिळविण्याच्या नावाखाली UPI PIN टाकणे टाळावे. कोणताही QR कोड स्कॅन करण्यापूर्वी त्याचा उद्देश तपासावा, असेही सांगण्यात आले.सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधासोशल मीडियावर वैयक्तिक माहिती, छायाचित्रे आणि लोकेशन अनावश्यकपणे शेअर करू नये. बनावट प्रोफाइल, ऑनलाइन ब्लॅकमेलिंग, छायाचित्रांचे मॉर्फिंग किंवा महिला व मुलांच्या ऑनलाइन शोषणासारखे प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा. ज्येष्ठ नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी, असेही मार्गदर्शन करण्यात आले.सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास विलंब न करता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक १९३० वर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी. मोबाईल व ऑनलाइन खात्यांसाठी मजबूत आणि वेगवेगळे पासवर्ड वापरणे तसेच शक्य असेल तेथे टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहून गोपनीय माहिती सुरक्षित ठेवावी. सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास भीतीपोटी तक्रार करण्यास विलंब करू नये. वेळेत तक्रार केल्यास आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी मदत होऊ शकते, असे आवाहन पोलीस स्टेशन सिरोंचा यांच्या वतीने करण्यात आले.जनजागृती हीच सायबर सुरक्षेची पहिली पायरी!








