नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या पुढाकारातून भव्य कार्यक्रमाचे आयोजन; सायंकाळी ५ वाजल्यापासून रंगणार सांस्कृतिक सोहळा …!
संपादक – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : तेलंगणा राज्याच्या सीमेला लागून असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपरिक बथुकम्मा (गौरी पूजा) उत्सवाला मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने सुरुवात झाली आहे. या उत्सवाच्या निमित्ताने येत्या १४ ऑक्टोबर रोजी नगर उपाध्यक्ष बबलू पाशा यांच्या वतीने विशेष भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तेलंगणातील प्रसिद्ध गायिका मधुप्रिया सायंकाळी ५ वाजल्यापासून आपल्या गीतांची प्रस्तुती करणार आहेत.बथुकम्मा हा तेलंगणा राज्यातील महिलांचा पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्व असलेला उत्सव आहे. निसर्ग, फुले आणि गौरी मातेच्या पूजेला समर्पित असलेला हा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. या काळात महिला विविध रंगांच्या नैसर्गिक फुलांचे थर रचून शंकूच्या आकाराची आकर्षक बथुकम्मा तयार करतात. पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या महिला बथुकम्माभोवती गोलाकार उभ्या राहून टाळ्यांच्या तालावर पारंपरिक लोकगीते गातात आणि नृत्य करतात.सिरोंचा परिसरात तेलंगणा संस्कृतीचा मोठा प्रभाव असल्याने बथुकम्मा उत्सवाला विशेष महत्त्व आहे. दरवर्षी या उत्सवातून महिलांचा उत्साह, सांस्कृतिक परंपरा आणि निसर्गाप्रती असलेली श्रद्धा अनुभवायला मिळते. यंदा प्रसिद्ध गायिका मधुप्रिया यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.या विशेष सांस्कृतिक सोहळ्याला सिरोंचा शहरासह परिसरातील नागरिकांनी, महिला भगिनींनी आणि बथुकम्मा उत्सवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगर उपाध्यक्ष बबलू पाशा, सिरोंचा यांनी केले आहे.











