जयस्तंभ ग्राउंडवर भव्य सांस्कृतिक कार्यक्रम; नगराध्यक्ष पद्मा सतीश बोगे यांच्यासह नगरसेवकांचे समस्त सिरोंचावासीयांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सागर मूलकला सिरोंचा प्रतिनिधी
सिरोंचा : तेलंगणा सीमेलगत असलेल्या सिरोंचा तालुक्यात पारंपरिक बथुकम्मा उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असून, यानिमित्ताने मंगळवार, दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी जयस्तंभ ग्राउंड, सिरोंचा येथे भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात तेलंगणातील लोकप्रिय गायिका निर्मला राठोड यांच्या गायनाचे विशेष आकर्षण राहणार आहे.या कार्यक्रमाला गडचिरोलीच्या सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. बथुकम्मा उत्सव हा तेलंगणा संस्कृतीतील महत्त्वाचा पारंपरिक सण असून, फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक पूजा, सांस्कृतिक परंपरा आणि महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. सिरोंचा परिसरातील तेलुगू भाषिक नागरिकांसह विविध समाजघटकांमध्येही या उत्सवाबाबत उत्सुकता आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगराध्यक्ष पद्मा सतीश बोगे, नगरसेवक जगदीश रलबंडीवार, नगरसेविका, नगरसेवक आणि इतर संबंधितांकडून तयारी करण्यात येत आहे. या सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून स्थानिक परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासोबतच नागरिकांना एकत्र येण्याची संधी मिळणार आहे.समस्त सिरोंचावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बथुकम्मा उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन नगराध्यक्ष पद्मा सतीश बोगे, नगरसेवक जगदीश रलबंडीवार तसेच नगरसेविका व नगरसेवकांनी केले आहे.











