सिरोंचा पोलिसांकडून जनजागृती; ७० विद्यार्थी सहभागी
संपादक – सागर मूलकला सिरोंचा
सिरोंचा : सरकारी अधिकारी असल्याचे भासवून धमकावणे, खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याची भीती दाखवणे आणि ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पैसे उकळणे, अशा सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन सिरोंचा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांनी केले.भगवंतराव ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेवर जनजागृतीपर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी सुमारे ७० विद्यार्थी-विद्यार्थिनी व प्राध्यापक उपस्थित होते.पोलीस, सीबीआय, ईडी, कस्टम्स किंवा आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना धमकावले जाते. ‘तुमच्या नावावर गुन्हा आहे’, ‘आधारचा गैरवापर झाला’ किंवा ‘कुटुंबातील व्यक्तीला अटक झाली’ असे सांगून पैसे उकळले जातात, अशी माहिती निरीक्षक दुधाळ यांनी दिली.कायद्यात ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही प्रक्रिया नाही. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना ओटीपी, एटीएम पिन, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती देऊ नये. फसवणूक झाल्यास तातडीने १९३० या हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा www.cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवावी, असे पोलिसांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेची शपथ घेतली. हा उपक्रम वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला.
या जनजागृती कार्यक्रमास भगवंतराव ज्युनियर कॉलेज प्राध्यापक श्री के एम दुर्गम, श्री तिरुमल सर, श्री साजिद शेख, श्री संदीप खोब्रागडे, प्राध्यापिका कु स्वाती येनमवार, कु नुसरत शेबीख तसेच 70 विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.











