कलार समाजाच्या अनेक दिवसांच्या मागणीला यश; नगराध्यक्षा पद्माताई भोगे यांचे सहकार्य
आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून मंदिर उभारणीच्या कार्याला बळ
सागर मूलकला सिरोंचा, संपादक
सिरोंचा : सिरोंचा येथे श्री रेणुका येल्लम्मा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्याची कलार समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली. समाजबांधवांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना आणि मातेप्रती असलेल्या अपार श्रद्धेला यश मिळाल्याने कलार समाजात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.आज पार पडलेल्या या मंगलमय सोहळ्यात सिरोंचा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा श्रीमती पद्माताई सतीश भोगे यांच्या हस्ते श्री रेणुका येल्लम्मा मातेची विधिवत पूजा-अर्चना करण्यात आली. या धार्मिक कार्यासाठी त्यांनी आर्थिक मदत करून मोलाचे सहकार्य केले.तसेच, आमदार डॉ. राजे धर्मराव बाबा आत्राम यांच्या पुढाकारातून मंदिर उभारणीच्या कार्याला चालना मिळाल्याने कलार समाजाच्या या धार्मिक आणि सामाजिक उपक्रमाला महत्त्वपूर्ण बळ मिळाले.या प्रसंगी कलार समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली. मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी उपस्थिती लावत आनंद व्यक्त केला.श्री रेणुका येल्लम्मा मातेच्या मूर्तीची स्थापना हा कलार समाजासाठी श्रद्धा, एकजूट आणि सामाजिक बांधिलकीचा महत्त्वपूर्ण क्षण ठरला आहे. अनेक दिवसांपासूनची मागणी पूर्ण झाल्याने समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.यावेळी श्री रेणुका येल्लम्मा मातेच्या चरणी सर्व समाजबांधवांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदावा, तसेच समाजाची एकजूट कायम राहावी, अशी प्रार्थना करण्यात आली.











