प्रतिनिधी सागर मुलकला, सिरोंचा, गडचिरोली
सिरोंचा येथील जयस्तंभ परिसरात सिरोंचा नगर पंचायतचे नगराध्यक्षा सौ. पद्मा सतीश बोगे आणि १४ नगरसेवकांच्या वतीने भव्य बथुकम्मा उत्सव धार्मिक श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला. शहरातील विविध समाजांतील हजारो महिलांनी रंगीबेरंगी फुलांनी सजविलेल्या बथुकम्मांसह उत्सवात सहभाग घेतला.उत्सवाची सुरुवात तेलुगू परंपरेनुसार देवीच्या विधिवत पूजाविधीने करण्यात आली. महिलांनी पारंपरिक पद्धतीने देवीची आराधना करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. फुलांनी सजलेले बथुकम्मा, पारंपरिक गीते आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे जयस्तंभ परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.या उत्सवाला तेलगू प्रसिद्ध गायिका निर्मला मॅडम आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती जिल्हाध्यक्ष तनुश्री ताई आत्राम यांची विशेष उपस्थिती होती. तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध विभागांतील अधिकारी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.बथुकम्मा हा तेलंगणा प्रदेशातील पारंपरिक सांस्कृतिक उत्सव असून, फुलांच्या माध्यमातून देवीची आराधना करणे हे त्याचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सिरोंचा शहरातही या उत्सवाच्या माध्यमातून तेलुगू संस्कृती, धार्मिक परंपरा आणि महिला एकजुटीचे दर्शन घडले.*
*धार्मिक श्रद्धा, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा हा भव्य बथुकम्मा उत्सव सिरोंचावासीयांसाठी विशेष आकर्षण ठरला.











